Easy No Fail Jowar Roti Recipe - Indian Millets Bread
अजिबात कष्ट न घेता गरम भाकरी पानात पडण्यासारखे सुख नाही. एक खूप मस्त, सोपी पद्धत तुमच्या बरोबर शेअर करते आहे. त्यामुळे पीठ ताजं आहे की जुनं, पाणी फिरवणे, थापणे अशी कोणतीही कटकट न होता खमंग, सुबक आणि मऊ अशी भाकरी करू शकाल.भारतात राहणार्यांना खरंतर याचे काहीचं अप्रूप वाटणार नाही. कारण हवं तेव्हा, पाहिजे त्या प्रकारचं ताजं पीठ दळून आणण्याची चैन भारतात करता येते आणि त्याहूनही मजा म्हणजे हवं तेव्हा, हवं ते करून देणार्या 'मावश्या' असतात.😀 पण परदेशात हे लाड नसतात. शिवाय पीठ वगैरे चांगले आणि ताजे असेलच याची खात्री देता येत नाही. अश्या वेळेस असे सोप्पे उपाय मदतीला येतात. मी केलेल्या भाकर्या बाजरीच्या आहेत.
साहित्य -
1 ते 11/2 वाटी ज्वारी किंवा बाजरीचे पीठ
1 वाटी कणिक
2 टे स्पून तेल
पीठ भिजवायला पाणी
कृती -
परातीत कणिक आणि भाकरीचे पीठ घेऊन त्यात तेल घाला.
लागेल तसे पाणी घालून फुलक्यांसाठी भिजवतो तितकी घट्ट कणिक भिजवा.
थोडावेळ झाकून ठेवा.
नंतर छानपैकी मळून घ्या आणि नेहमीसारखे फुलके करा.
तवा व्यवस्थित तापला की लाटलेला फुलका तव्यावर टाका.
काही सेकंदात तव्याकडच्या बाजूचा जस्ट रंग बदलला की भाकरी उलटा.
खालची बाजू 1 - 2 मिनिटे होऊ द्या.
लगेच उचलून वरची, कमी भाजलेली बाजू फ्लेमवर येईल अशी भाजा.
भाकरी हमखास मस्त फुगते.





Comments
Post a Comment